Zeeshan Siddique: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) गोटातून एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या विधान परिषद आमदारकीवर आता कायदेशीर टांगती तलवार निर्माण होण्याची शक्यता आहे. सिद्दीकी यांना पक्षाकडून देण्यात आलेल्या 'एबी फॉर्म'वर (AB Form) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेली सही वादाच्या भोवर्‍यात सापडली असून, यामुळे सिद्दीकी यांचा अर्ज अडचणीत येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

अजित पवार गटाने विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा केली होती. पक्षाच्या बैठकीनंतर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. मात्र उमेदवारी जाहीर होताच आता त्यांच्या एबी फॉर्मवरून पेच निर्माण झालाय. एकीकडे पक्षात सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष नसल्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सही केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या सहीच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Zeeshan Siddique: सुनील तटकरे यांनी केलेल्या सहीवर प्रश्नचिन्ह

29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या सहीने पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर ‘प्रदेशाध्यक्ष’ असा कोणताही उल्लेख नसल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, या पत्रात पक्षाकडून करण्यात येणारा पत्रव्यवहार अंतिम मानावा, असाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर 30 एप्रिल रोजी झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेली सही आता वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. कायदेशीर प्रक्रियेदरम्यान या मुद्द्यावर आक्षेप घेतला गेल्यास झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

NCP Ajit Pawar Faction: अजित पवार गटाच्या नेत्यांचं शरद पवारांकडे साकडं 

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांनी शरद पवारांकडे साकडं घातल्याची माहिती समोर येत आहे. सध्या राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात काही मोठे फेरबदल केले जात आहेत आणि त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडे मदतीची मागणी अजितदादा गटाच्या नेत्यांनी केली आहे. शरद शरद पवार गटातील एका बड्या नेत्याने या वृत्ताला दुजोरा देखील दिला आहे.