Delhi Capitals vs Rajasthan Royals IPL 2026 : आयपीएल 2026च्या 62 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 5 गडी राखून शानदार विजय मिळवला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक (टॉस) जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 193 धावा केल्या आणि दिल्लीसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवले. अटीतटीच्या वाटणाऱ्या या सामन्यात दिल्लीने 19.2 षटकांत 5 बाद 197 धावा करत अत्यंत सहजपणे विजयावर शिक्कामोर्तब केले. 4 चेंडू राखून दिल्लीने 5 गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला.

प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट

दिल्ली कॅपिटल्सच्या या विजयामुळे प्लेऑफच्या शर्यतीत मोठा उलटफेर झाला आहे. दिल्ली आता जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यांचं क्वालिफिकेशन पूर्णपणे इतर संघांच्या निकालांवर अवलंबून आहे. मात्र, दिल्लीने राजस्थानचं गणितही पूर्णपणे बिघडवलं आहे. राजस्थान आणि दिल्ली या दोन्ही संघांचे प्रत्येकी 12 गुण आहेत, पण राजस्थानचे अजून 2 सामने बाकी आहेत, तर दिल्लीकडे फक्त 1 सामना शिल्लक आहे.

राहुल-पोरेल-स्टार्क यांची कमाल

194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 105 धावांची शानदार सलामी भागीदारी झाली. राहुलने 42 चेंडूत 56 धावा केल्या, तर पोरेलने 31 चेंडूत 51 धावांची तुफानी खेळी साकारली. ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड मिलरसारखे धडाकेबाज फलंदाज अपयशी ठरले, पण कर्णधार अक्षर पटेलने 18 चेंडूत 34 धावांची झंझावाती खेळी करत दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या.

विजयी फटका आशुतोष शर्माच्या बॅटमधून आला. त्याने अवघ्या 5 चेंडूत 18 धावांची स्फोटक खेळी केली. दिल्लीच्या या विजयात मिचेल स्टार्कचं योगदानही अमूल्य ठरलं. स्टार्कने राजस्थानच्या 4 फलंदाजांना बाद करत सामन्याचं चित्र बदललं. तसेच लुंगी एनगिडी आणि माधव तिवारी यांनीही भेदक मारा करत 2-2 विकेट्स घेत राजस्थानला मोठा धक्का दिला.

ध्रुव जुरेलने ठेकले अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 8 गडी गमावून 193 धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने 40 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावा केल्या. कर्णधार रियान परागने 26 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांसह 51 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने 21 चेंडूंमध्ये 46 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने 4 बळी घेतले, तर लुंगी एनगिडी आणि माधव तिवारी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.