नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुलभ व्हावा यादृष्टीने चार हजार ५०० बस तैनात करण्यात येणार (Nashik Kumbh Mela 2027) आहेत. कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार केला आहे. दररोज ३३ लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक क्षमता निर्माण केली जाणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या वाहतूक आराखड्यात बाह्य वाहनतळ, अंतर्गत प्रवासी उतरविण्याची ठिकाणे आणि रामकुंड तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पायी मार्ग व्यवस्था अशा तीन स्तरांवर नियोजन केले आहे. त्या अंतर्गत रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी ४६ बाह्य वाहनतळांपासून विशेष बस सोडण्यात येतील.
त्यामध्ये नाशिकमधील बाह्य वाहनतळ ते अंतर्गत ठिकाणांसाठी ९०० बस, नाशिक वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर मार्गासाठी एक हजार ४८५ बस, तर त्र्यंबकेश्वरमधील अंतर्गत वाहतुकीसाठी ३२५ बस उपलब्ध असतील. गर्दीच्या काळातील अतिरिक्त गरज लक्षात घेऊन २९० बस राखीव ठेवण्यात येणार आहेत. या व्यवस्थेद्वारे २४ तासांत सुमारे ४०७ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. दररोज सुमारे २५.३६ लाख भाविकांची वाहतूक करण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे.


